सोलापूर : श्री संत गजानन महाराज (शेगाव) पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने तयारीला वेग दिला असून, शहरात मुक्काम करणाऱ्या हजारो भाविक व वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेचा बुधवारी सविस्तर आढावा घेण्यात आला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, नगर अभियंता सारिका आकूलवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेश परदेशी, नगरसेविका राजेश्री दोडमणी, पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधी सुनील फाळके, सुनील कुलकर्णी यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
पालखी सोहळ्याच्या स्थानिक प्रतिनिधींनी दरवर्षी महापालिकेकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत यंदा पाणी गिरणी येथील स्वागतस्थळी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, फिरते स्वच्छता पथक, अधिक प्रकाश व्यवस्था, मुक्कामाच्या ठिकाणी फोकस लाईट, पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याची मागणी केली.
यावेळी महापौरांनी पालखी मार्गाची संपूर्ण स्वच्छता, खड्डे तातडीने बुजविणे, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, अखंड वीजपुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, मोबाइल स्वच्छतागृहे, अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, आरोग्य पथक, रुग्णवाहिका आणि औषधोपचाराची व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी स्वच्छता, कचरा संकलन, सुरक्षित वातावरण आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा हा श्रद्धा, सेवा आणि समन्वयाचा उत्सव आहे. सोलापूरात येणाऱ्या प्रत्येक भाविक व वारकऱ्याला स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. सर्व विभागांनी जबाबदारीने काम करून पालखी सोहळा निर्विघ्न आणि यशस्वी करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
बैठकीतील प्रमुख निर्देश
– पालखी मार्गाची विशेष स्वच्छता मोहीम.
– सर्व खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश.
– अतिरिक्त प्रकाश व्यवस्था व फोकस लाईट.
– पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि मोबाइल स्वच्छतागृहे.
– आरोग्य पथक, रुग्णवाहिका व प्राथमिक उपचार केंद्र.
– वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी स्वच्छता व सुरक्षा.
– वाहतूक व गर्दी व्यवस्थापनासाठी पोलीस-महापालिका समन्वय.
– नव्या पालखी मार्गावरही सर्व नागरी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश.
—
Post Views: 33