सोलापूर – भारतीय संविधान दिनानिमित्त मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट सोलापूर, डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशन सोलापूर व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान चषक १७ वर्षांखालील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या मुलींच्या गटाचे अजिंक्यपद श्री स्वामी विवेकानंद प्रशालेने पटकावले. चुरशीच्या अंतिम सामन्यात त्यांनी मंद्रूप प्रशालेचा २-१ असा पराभव केला.
अंतिम सामन्यात श्री स्वामी विवेकानंद प्रशालेने १५-११, १०-१५, १५-१२ अशा सेट्समध्ये बाजी मारली. विजेत्या संघाकडून प्रांजली शिंदे व अमृत परकीपडला यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, तर मंद्रूप प्रशालेकडून आरतीने एकाकी कडवी झुंज दिली. स्पर्धेत सेवासदन प्रशालेने तिसरा क्रमांक मिळवला.
तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन सोलापूर विभागाचे सचिव सचिन बनसोडे यांच्या हस्ते मैदानाच्या पूजनाने झाले. याप्रसंगी डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव ऋषिकेश यरगल, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू मुजम्मिल जरतार, निलेश वरवडकर, आकाश भोसले, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर काळे, इंगळगी, शिंदे, हवलदार, सोहेल शेख आदी उपस्थित होते.
स्पर्धेत मुलांच्या गटात १६ आणि मुलींच्या गटात १४ संघ सहभागी झाले असून, त्यात मंद्रूप, करमाळा व वळसंग येथील ग्रामीण संघांचा समावेश आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू सुदेश मालप यांनी केले.






















