सोलापूर – औषध विक्रीतील गैरप्रकार, रुग्णांची आर्थिक फसवणूक आणि जनरिक औषधांच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सोलापूरचे विस्तार अधिकारी (आरोग्य) एम. ए. निरोटे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात खासगी रुग्णालयांमध्ये विशिष्ट ब्रँडचीच औषधे लिहून देऊन ती संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमधूनच खरेदी करण्यास रुग्णांना भाग पाडले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना जास्त किंमत मोजावी लागत असून या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच ब्रँडेड औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवून जनरिक औषधांचा वापर वाढविणे, हॉस्पिटल परिसरातील मेडिकल स्टोअर्समधील गैरप्रकारांवर कारवाई करणे, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांकडून औषधांसाठी घेतली जाणारी रक्कम परत न करण्याच्या प्रकारांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय सर्जिकल साहित्यावरील किंमत स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करावे, सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये जनरिक औषधे उपलब्ध ठेवावीत, डॉक्टरांनी रुग्णांना जनरिक औषधांचा पर्याय सुचवावा, तसेच जनरिक औषधे व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित आणि परवडणारी औषधे उपलब्ध व्हावीत तसेच औषध विक्रीतील गैरप्रकारांना आळा बसून आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता वाढावी, यासाठी प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा एम. ए. निरोटे यांनी व्यक्त केली आहे.
Post Views: 15