सोलापूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेने किमान चार दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आयोगाने विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल घेत दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने संघटनेच्या मागणीला अंशतः यश आले आहे.
राज्यभरातील १६ हजार ७१७ पदांसाठी आयोजित या परीक्षेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यातून चार लाखांहून अधिक, तर सोलापूर जिल्ह्यातून २९ हजारांपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. मुदतवाढ मिळाल्याने अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आयोगाने २५ जून २०२६ रोजी जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त पदांचा समावेश करण्यासाठी शुद्धिपत्रक काढण्यात आले. दरम्यान, २७ नोव्हेंबर रोजी समतुल्य शैक्षणिक अर्हतेसंदर्भात नवीन शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे सुधारित पात्रतेनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता उमेदवारांना २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जातील माहिती तपासून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर म्हणाले, “एमपीएससी गट-क पूर्व परीक्षा २०२६ साठी अर्ज करताना उमेदवारांना तांत्रिक अडचणी तसेच कागदपत्रे मिळण्यास होणाऱ्या विलंबाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आयोगाकडे किमान चार दिवसांची मुदतवाढ देण्याची ठोस मागणी केली होती. आयोगाने दोन दिवसांची मुदतवाढ दिल्याने समाधान आहे. मागणी पूर्णपणे मान्य झाली नसली, तरी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आयोगाचे स्वागत करतो.”