सांगोला- तालुक्याच्या पाणीप्रश्नाच्या कायमस्वरूपी निराकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नीरा देवधर कालवा योजनेतील १ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या कामाला गती देण्याबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने नीरा देवधर कालवा योजनेत बाष्पीभवनामुळे होणाऱ्या पाण्याच्या बचतीतून १ टीएमसी पाणी सांगोला मतदारसंघासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वेक्षण अहवाल, प्रस्तावित कामाची तांत्रिक प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि पुढील कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून कामाला गती देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बैठकीत सांगोला मतदारसंघासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे आश्वासन ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. याप्रसंगी आ.बाबासाहेब देशमुख, माजी आ.शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत तसेच निरा देवधर कालवा समितीचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
चौकट-
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नीरा देवधर कालव्यातून सांगोल्यासाठी १ टीएमसी पाणी मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला गती मिळत आहे, ही सांगोल्याच्या जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठीचा हा लढा थांबणार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रश्नावर देवाभाऊंसोबत खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत आणि सांगोल्याला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष अधिक जोमाने सुरू राहील.
-चेतनसिंह केदार सावंत, सोलापुर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती