सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रवेश प्रक्रियेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले ऑनलाइन थेट प्रवेशाचे परिपत्रक रद्द करण्यात आले असून, आता पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयांच्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे नऊ जुलैच्या पत्राने संलग्न महाविद्यालयाना कळविले आहे.
विद्यापीठाने १६ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रक क्रमांक १० नुसार, संलग्न महाविद्यालयातील सर्व प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून थेट विद्यार्थ्यांमार्फत ऑनलाइन त्यांच्या लॉगिन आयडी मधून करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता विद्यापीठाने हे परिपत्रक रद्द केले आहे.
—–
विद्यापीठाची सोमवारची ऑनलाइन बैठकही रद्द
ऑनलाइन थेट प्रवेशासाठी विद्यापीठाने नुकतीच सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कार्यशाळाही घेतली होती. परंतु
‘यू-डीलीप’ या नवीन सॉफ्टवेअरवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ विकास कृती समितीने कुलगुरूंकडे केली होती. समितीच्या अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि सचिव प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी या प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यानुसार विद्यापीठाने चर्चा करण्याकरता सोमवारी १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता कृती समिती व सर्व प्राचार्यांची एक ऑनलाईन बैठकही आयोजित केली होती. मात्र ही बैठकही विद्यापीठाने रद्द केली आहे
——
कृती समितीची शुक्रवारची बैठकही रद्द
ही बैठक ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन घ्यावी अशी भूमिका कृती समितीची होती. त्यामुळे
या ऑनलाइन बैठकीत काय भूमिका घ्यायची यासाठी कृती समितीने शुक्रवारी (दि. १०) सोशल महाविद्यालयात कृती समिती व सर्व प्राचार्यांची बैठक बोलावली होती. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी कोणत्याही प्राधिकरणामध्ये चर्चा न करता तसेच त्यावर चर्चा न करता घेतलेला हा निर्णय अंगलट येतो की काय? त्यामुळेच त्यांनी ही बैठक न घेता ऑनलाइन बैठकही रद्द केली आणि परिपत्रकही मागे घेतले. त्यामुळे कृती समितीनेही ही बैठक रद्द केली आहे.
——-
नवीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया आणि अटी:
१. डिजिटल डेटा आणि पेमेंट सबमिशन: महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ‘Digitally Data and payment’ त्यांच्या संगणक प्रणालीमधून (Software) विद्यापीठास API द्वारे सादर करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया प्रवेश पूर्ण झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
२. निष्काळजीपणास महाविद्यालय जबाबदार: प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत डिजिटल डेटा आणि पेमेंट विद्यापीठास प्राप्त न झाल्यास, विद्यार्थ्यांचे जे काही नुकसान होईल, त्याला सर्वस्वी संबंधित महाविद्यालय जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा विद्यापीठाने दिला आहे.
——-

















