सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अभय योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधितांनी थकबाकीदारांना नोटिसा न वाटल्याचे आढळून आल्याने प्रत्येकी दोन हजार रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.
मनपाने ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अभय योजना राबविली असून, मालमत्ता कर थकबाकीदारांना १०० टक्के दंडमाफीचा लाभ देण्यासाठी सप्टेंबर २०२६ पर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित गाळेधारकांना नोटिसा देण्याचे आदेश ७ जुलै रोजी आयुक्तांनी दिले होते. मात्र, आढावा बैठकीत संबंधित कर्मचाऱ्यांनी एकही नोटीस वाटप न केल्याचे समोर आले. या निष्काळजीपणामुळे महसूल वाढीस अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार कारवाई करण्यात आली. चार कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम जुलै २०२६ च्या वेतनातून ऑगस्ट महिन्यात एकरकमी वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
—-
Post Views: 14