पंढरपूर -धनश्री पतसंस्थेच्या कर्जदारास चेक बाऊन्स केसमध्ये शिक्षा कायम करण्यात आली असून आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.
यात हकीकत अशी की, सदरचे प्रकरणातील सामनेवाले ही धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असून कर्जदारांना कर्ज पुरवठा करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्यांनी यातील कर्जदार धोंडीबा शिवाप्पा कुटे यास नियमित कर्ज पुरवठा केला होता. परंतु सदर कर्जदारांनी नियमित कर्जाची परतफेड केली नाही. सदर कर्ज थकीत गेल्यानंतर सदर कर्जाचेपोटी परतफेडीसाठी म्हणून सदर पतसंस्थेस आरोपीने त्याचे बँक खातेचा धनादेश दिलेला होता, सदर धनादेश न वटता बँकेने परत केलेमुळे त्याचेविरुध्द धनश्री पतसंस्थेने मंगळवेढा येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात एन.आय.अक्ट
(N.I.Act ) कलम १३८ अन्वये संक्षिप्त फौजदारी खटला. १९२/२०१४ ही केस दाखल केलेली होती. त्यामध्ये सदर कर्जदाराविरुध्द मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस सदर गुन्ह्याकरीता 1 महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती व फिर्यादी संस्थेस १,१०,००० /- (रक्कम – एक लाख दहा हजार रुपये) नुकसानभरपाई देणेबाबत आरोपीस आदेशित केले होते, जर आरोपीने २ महिन्याचे आतमध्ये सदर नुकसानभरपाईची रक्कम देणेस कसूर केलेस आरोपीस अतिरिक्त १ महिना सश्रम कारावास ठोठावला होता. त्यानिकालाचे विरोधात सदर कर्जदाराने पतसंस्थेविरोधात पंढरपूर येथील मे जिल्हा न्यायालयात फौजदारी अपिल क्र.३३/२०१८ हे दाखल केलेले होते.
सदर अपिलामध्ये सामनेवाले बँकेचेवतीने ॲड. एस.एम. हावनाळे यांनी काम पाहिले. पंढरपूर येथील मे जिल्हा न्यायालयाने सदरचे अपिल दि.१७ जानेवारी २०२६ रोजी नामंजूर केले व सदर ॲपेलंट आरोपी धोंडीबा कुटे याचेविरोधात काॅन्विक्शन वाॅरंट जारी केले होते. सदर न्यायालयीन आदेशानुसार मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालया समोर आरोपीस हजर केले असता, सदर आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यात धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने माहितगार इसम विश्वनाथ नागणे, सतिश कोंडुभैरी तसेच संस्थेतर्फे ॲड. एस.एम.हावनाळे, ॲड.संगम सुकदेव मोरे यांनी काम पाहिले.