सोलापूर – वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. वारकऱ्यांचा सन्मान व स्वागत व्हावे, याबाबत संभाजी ब्रिगेडची कोणतीही हरकत नाही. मात्र, वारकरी स्वागताच्या नावाखाली डिजिटल बॅनरवर तब्बल ₹२ कोटी खर्च करण्याचा निर्णय हा जनतेच्या कराच्या पैशांची उधळपट्टी असून तो निषेधार्ह आहे त्यामुळे जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने अनावश्यक डिजिटल बॅनरचा मक्ता तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, आरोग्य सुविधांचा अभाव, स्वच्छतेचे प्रश्न आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत कोट्यवधी रुपये प्रसिद्धीवर खर्च करण्याऐवजी तो निधी वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा उभारण्यासाठी वापरणे अधिक गरजेचे आहे. वारकरी हा विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो त्याला स्वागत कमानीची किंवा प्रसिद्धीची कोणतीही गरज नसते त्यामुळे वारकऱ्यांच्या नावाखाली जो अनावश्यक भ्रष्टाचार जिल्हा परिषद प्रशासन करीत आहे तो त्वरित थांबवण्यात यावा
संभाजी ब्रिगेडची शासनाकडे मागणी आहे की, डिजिटल बॅनरवरील ₹२ कोटींचा खर्च तात्काळ रद्द करून तो निधी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, निवारा, वाहतूक व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांवर खर्च करण्यात यावा.
जनतेच्या कराच्या पैशाचा वापर दिखावा आणि प्रसिद्धीसाठी नव्हे, तर जनहितासाठी व्हावा, हीच लोकांची अपेक्षा आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

















