सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील तांत्रिक विभागात अखेर बहुप्रतीक्षित प्रशासकीय फेरबदलाला मंगळवारी मूर्त स्वरूप मिळाले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, भूमापक आदींसह ५६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले. याचबरोबर तांत्रिक संवर्गातील १३ अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर पदस्थापना देण्यात आली असून सर्व संबंधितांना तातडीने नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू होती. सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या याद्यांवर महापालिका पदाधिकारी आणि आयुक्त यांच्यात एकमत झाल्यानंतर अखेर या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. बदल्यांमध्ये ५६ तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असून १३ पदोन्नत अधिकाऱ्यांची पदस्थापनाही करण्यात आली आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रथम तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळालेले व्यंकटेश चौबे यांना सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणूनच कायम ठेवण्यात आले. तर कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांची नगर अभियंता विभागात बदली करण्यात आली असली तरी त्यांचे काम नगररचना कार्यालयातच सुरू राहणार आहे.
पदोन्नती प्रक्रियेत ४ जणांना उपअभियंता, २ जणांना कनिष्ठ अभियंता, मुख्य सफाई अधीक्षक, सफाई अधीक्षक, हेड माळी या पदांवर प्रत्येकी एक तर मुख्य आरोग्य निरीक्षक पदावर दोघांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानंतर काही अधिकाऱ्यांना त्याच विभागात तर काहींना अन्य विभागात पदस्थापना देण्यात आली. या बदल्यांमध्ये उपअभियंता अविनाश वाघमारे यांची नगररचना विभागाकडे, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवानजी यांची झोन कार्यालय क्रमांक १, मोहम्मद हनीफ बक्षी यांची झोन क्रमांक २, राघवेंद्र गायधनकर यांची झोन क्रमांक ७, तर शाम कन्ना यांची झोन क्रमांक ८ येथे विभागीय कार्यालय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता सुनीता हिबारे यांना झोन कार्यालयातून नगर अभियंता विभागात आणण्यात आले आहे.
तसेच कनिष्ठ अभियंता अभिजीत बिराजदार यांची नगर अभियंता विभागात, मानधनावरील कनिष्ठ अभियंता सागर खरोसेकर यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात, दीपक कुंभार यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात, चेतन प्रचंडे यांची विभागीय कार्यालय क्रमांक ३, तर कल्याणी बिराजदार यांची सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयात बदली करण्यात आली आहे. याशिवाय ४७ कायम अभियंता व भूमापक तसेच मानधनावरील ९ कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्यांचाही आदेश जारी करण्यात आला आहे.
महत्त्वाचे फेरबदल असे –
– ५६ तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, १३ अधिकाऱ्यांना पदोन्नतीनंतर पदस्थापना.
– प्रकाश दिवाणजींसह चार सहाय्यक अभियंत्यांकडे झोन कार्यालयांची जबाबदारी.
– अविनाश वाघमारे, सुनीता हिबारे, अभिजीत बिराजदार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या.
– ४७ कायम व ९ मानधनावरील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या; तातडीने रुजू होण्याचे आदेश.
——-
Post Views: 17