सोलापूर – पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनने मोठा पुढाकार घेतला असून, जिल्ह्यातील प्रत्येक सहकारी पतसंस्थेने किमान १०० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी केले आहे. या उपक्रमातून जिल्ह्यात तब्बल १ लाख १५ हजार वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यावरणपूरक संकल्पनेला तसेच राज्य शासनाच्या ३० कोटी वृक्ष लागवड अभियानाला सहकार क्षेत्राने सक्रिय साथ द्यावी, या उद्देशाने फेडरेशनने जिल्ह्यातील सर्व १,१५० सहकारी पतसंस्थांना पत्र पाठवून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि पर्यावरणीय असमतोल यामुळे निर्माण होणारी आव्हाने लक्षात घेता, वृक्षलागवड ही केवळ सरकारी योजना न राहता सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची गरज असल्याचे पतंगे यांनी नमूद केले आहे.
वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असल्याने प्रत्येक संस्थेने याचे नियोजनबद्ध नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. फेडरेशनच्या या उपक्रमामुळे सहकार क्षेत्राची सामाजिक बांधिलकी अधिक अधोरेखित होणार असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. सर्व पतसंस्थांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध जागांचा वापर करून विविध देशी प्रजातींची झाडे लावावीत आणि त्यांचे दीर्घकालीन संगोपन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Post Views: 13