सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेताना खासदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचार, अनागोंदी आणि निष्क्रियतेमुळे विकासकामे रखडल्याचा आरोप करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेत झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत भैय्या चौक-मरीआई चौक रेल्वे पूल, आसरा पूल, नालेसफाई, समांतर जलवाहिनी, पाणीपुरवठा, नगरोत्थान योजनेतील ड्रेनेज, शुभराय आर्ट गॅलरी, तेलगू भवन, सेटलमेंट मैदान आदी कामांचा आढावा घेण्यात आला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक)-मरीआई चौक रेल्वे पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आसरा पूल वाहतुकीसाठी बंद करूनही काम सुरू नसल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारत ३१ मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याबाबत लेखी हमी मागितली.
नालेसफाई अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना फटका बसू शकतो, असे सांगत मुर्गी नाला, शहारी नाला, कुंभार वेस आणि गणेश वेस नाल्यांची सफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होऊनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याबद्दलही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
शुभराय आर्ट गॅलरी, तेलगू भवन, सेटलमेंट मैदान आणि रेल्वे अंडरपास येथील प्रलंबित कामांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व अपूर्ण विकासकामांसाठी आवश्यक मुदतवाढ २४ तासांत घेऊन कामांना गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.बैठकीस नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, नरसिंह आसादे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
—–
Post Views: 12