सोलापूर : महापालिकेच्या निधीच्या ठेवींच्या निर्णयावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. बंधन बँकेत ठेवी ठेवण्याच्या निर्णयावरून झालेला वाद अद्याप शांत झालेला नसतानाच आता आयसीआयसीआय बँकेत ठेवलेल्या ठेवींनाही भाजपमधील काही नगरसेवक व नगरसेविकांनी आक्षेप घेतला आहे. आयसीआयसीआयऐवजी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवी ठेवाव्यात, अशी मागणी करत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन दिले.
यापूर्वी बंधन बँक ही नवखी व तुलनेने छोटी बँक असल्याने तेथे ठेवी ठेवू नयेत, अशी भूमिका घेतल्यानंतर आयसीआयसीआय बँकेत ठेवी ठेवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार तरतूदही करण्यात आली. मात्र शुक्रवारी या निर्णयालाच भाजपमधील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवत स्टेट बँक ऑफ इंडिया ही अधिकृत व मोठी बँक असल्याने तेथेच ठेवी ठेवाव्यात, अशी मागणी केली.
आयुक्तांची भेट घेताना संबंधित नगरसेवकांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. महापालिका निवडणुकीदरम्यान सुमारे सहा कोटी रुपयांची बिले सादर करण्यात आली असून प्रत्यक्ष खर्च आणि बिलातील रक्कम यामध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. काही बिलांमधील रक्कम फुगवून दाखविण्यात आल्याचा दावाही त्यांनी आयुक्तांकडे केला.
आयसीआयसीआय बँक आणि घंटागाड्यांवरही प्रश्न
नुकतेच आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून महापालिकेला दोन घंटागाड्या देण्यात आल्या. यापूर्वी आयसीआयसीआय बँकेकडे सीएसआर निधी नव्हता, मग याच कालावधीत घंटागाड्या महापालिकेला का देण्यात आल्या, असा सवालही संबंधित नगरसेवकांनी उपस्थित केला.
बिलांची तपासणी करावी लागेल : आयुक्त
याबाबत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, “संबंधित नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिलेली बाब योग्य आहे. खर्च केलेली रक्कम आणि बिलामध्ये दिलेले आकडे यांची तपासणी करावी लागेल. प्रथमदर्शनी हे आकडे फुगवलेले असल्याचे निदर्शनास येत आहे.
Post Views: 9