सांगोला – राजकारणाच्या धकाधकीत आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर माणसांनी आपली नाती कशी जपावीत याचा आदर्श गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश तवडकर यांनी घालून दिला. सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य चारुदत्त जगताप आणि ना.रमेश तवडकर हे वर्गमित्र. तब्बल ३५ वर्षांपूर्वी क्रीडा मैदानावर आणि एकाच बाकावर बसून वर्गात फुललेली जीवाभावाची मैत्री आज मंत्रीपदाच्या वलयातही तितकीच घट्ट आणि नितळ आहे. त्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते ना.रमेश तवडकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या सत्काराचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी आपला मोठेपणा जपत प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व आपले मित्र चारुदत्त जगताप यांची प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
मनोगतात ना.रमेश तवडकर यांनी आपला २५ वर्षांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास उलगडला. त्यांनी स्थापन केलेल्या बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रम-धाम या उपक्रमाच्या माध्यमातून लोकसहभागातून गरिबांसाठी घरे बांधून देण्याच्या त्यांच्या कार्याची पंतप्रधानांनी कौतुक करत घेतलेली दखल सांगत त्यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनमोल प्रबोधन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा संचालक जनक टेकाळे, प्राचार्य अशोक काळे, प्राचार्य संजय हिरेकर, प्राचार्य दीपक अमोणकर, प्राचार्य विजयकुमार बोराडे, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सदस्य दिगंबर जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले.
Post Views: 16