पंढरपूर – शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पंढरपुरात शनिवारी (दि.१८) ‘सद्बुद्धी दिंडी’ काढून विठ्ठल चरणी साकडे घातले. ईसबावी येथून सुरू झालेल्या दिंडीत भरपावसात हजारो शेतकरी आणि विविध पक्षांचे नेते सहभागी झाले. संत नामदेव पायरीमार्गे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना या वेळी केली.
या दिंडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जयंत पाटील, सतेज पाटील, महादेव जानकर हे माजी मंत्री, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, आमदार अभिजित पाटील, कॉ.गिरीश फोंडे, राष्ट्रवादी (श.प.) जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, शेकापचे नेते डॉ.अनिकेत देशमुख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————
( कोण काय म्हणाले )
राजु शेट्टी – हा महामार्ग भाविकांसाठी नसून, गडचिरोलीतील खाणींमधून गोव्याला खनिज पोहोचविण्यासाठी बनवला जात आहे. भाविकांना या रस्त्यावरून जाताना प्रति किलोमीटर दहा रुपये टोल मोजावा लागणार आहे. शक्तिपीठ प्रकल्पाच्या नावाखाली २५ हजार एकर जमिनीवर वरवंटा फिरविण्याचे पाप सरकार करीत असून, हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली. त्याचबरोबर एकादशी दिवशी पांडुरंगच मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगून शक्तीपीठ रद्द करेल.
———————–
जयंत पाटील – जनतेचा विरोध डावलून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग लादला, तर येत्या काळात या सरकारचा शक्तिपात झाल्याशिवाय राहणार नाही.
———————
सतेज पाटील – विनाकारण बनवल्या जाणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गावर १ लाख ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, राज्यातील २२ हजार गावांना प्रत्येकी १ कोटी रुपये दिले, तर ग्रामीण भागातील रस्ते सुधारतील. मुख्यमंत्र्यांनी आषाढी पूजेला येताना एखाद्या सामान्य वारकऱ्याला विचारून पाहावे, म्हणजे या प्रकल्पाची गरज आहे की नाही हे त्यांना समजेल.
Post Views: 17