सोलापूर : आषाढी एकादशीचे औचित्य साधून मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर, सोलापूर येथे बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज तसेच वारकरी यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग आणि हरिनामाच्या घोषात परिसरात दिंडी काढली.
“ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला. विद्यार्थ्यांनी माऊली माऊली आणि विठ्ठल विठ्ठल या गीतांवर अप्रतिम लेझीम नृत्य सादर केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा आणि नैतिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले.
Post Views: 13