सोलापूर – आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ अभियानाचा आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. यावेळी आषाढी यात्रेतील उत्कृष्ट नियोजन, प्रभावी स्वच्छता व्यवस्थापन आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधत यशस्वी वारी घडवून आणल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पंढरपूर पंचायत समिती येथे झालेल्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करत, डॉक्टर, स्वयंसेवक आणि युवकांनी ‘चरणसेवा’ उपक्रमातून केलेली निस्वार्थ सेवा ही महाराष्ट्राच्या युवा शक्तीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले.
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात सोलापूर जिल्हा परिषदेने वारीच्या नियोजनात, स्वच्छता व्यवस्थापनात, वारकऱ्यांसाठी उभारलेल्या सुविधा आणि सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले. या यशामागे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वारी ही राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने उत्कृष्ट कार्य केले आहे.
यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३० ते ३५ लाख वारकऱ्यांनी पंढरपुरात दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, स्नानगृहे, विश्रांती केंद्रे, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि आपत्कालीन आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या. ‘चरणसेवा’ उपक्रमातून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय उपचार आणि औषधोपचाराचा लाभ मिळाला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, चंद्रभागा नदी परिसर, वाळवंट आणि संपूर्ण पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी संयुक्तपणे उल्लेखनीय योगदान दिले. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वारी घडविण्याचा उद्देश या अभियानातून यशस्वीपणे साध्य झाला. या समारोप कार्यक्रमात ‘निर्मलवारी–समृद्धवारी’ आणि ‘चरणसेवा’ उपक्रमांवरील माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, आमदार समाधान आवताडे, गोपीचंद पडळकर, मंगेश चव्हाण, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 6