सोलापूर – उच्च शिक्षणासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी ठराविक कालावधीची वाट पाहावी लागणार नाही. जिल्हा परिषदेच्या नेहरू वस्तीगृहाची प्रवेश प्रक्रिया बारमाही (वर्षभर) सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे. त्यामुळे रिक्त जागा उपलब्ध असतील तेव्हा विद्यार्थ्यांना वर्षातील कोणत्याही काळात अर्ज करून प्रवेश मिळू शकणार आहे. अशी माहिती शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
नेहरू वस्तीगृहात केवळ सहा हजार रुपये वार्षिक शुल्कात विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी निश्चित कालावधी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना संधी गमवावी लागत होती. नवीन निर्णयामुळे शिक्षणासाठी स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर पद्धतीने प्रवेश मिळणार आहे.
याच बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवालही चर्चेला आला. ऑडिटमध्ये जीर्ण व धोकादायक ठरलेल्या शाळांची दुरुस्ती किंवा नव्या इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणाबाबतही प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. शासकीय जागांवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
चौकट
कार्तिकी वारीसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधीचा प्रस्ताव
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो दिंड्यांना मार्गातील गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सांगोला, मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना विशेष निधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
कोट
“नेहरू वस्तीगृहाची बारमाही प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याही वेळी प्रवेश घेणे शक्य होईल. तसेच जीर्ण शाळांच्या नव्या इमारती आणि जिल्हा परिषद मालमत्तेचे संरक्षण यालाही समान प्राधान्य दिले जात आहे.”
– चेतनसिंह केदार सावंत, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद सोलापूर
Post Views: 14