बार्शी – तालुक्यातील ताडसौंदणे या गावाच्या शाश्वत विकासासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेत हे गाव दत्तक घेतले असून, ग्रामस्थ आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ पाणी संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. या उपक्रमामुळे गावातील पाणीटंचाई दूर होण्यासह भूजल पातळीत वाढ होऊन शेतीला मोठा लाभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांनी पाणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ‘आजच्या काळात पाणीटंचाई ही ग्रामीण भागासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत रोटरी क्लब आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलतारा प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे भूजल पातळी वाढेल, शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होईल आणि भविष्यातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.’
आमदार राऊत यांनी रोटरी क्लबने ताडसौंदणे गाव दत्तक घेऊन केवळ जलतारा प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक विकासाच्या विविध क्षेत्रांतही काम करावे. अशा सेवाभावी संस्थांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळते. हा उपक्रम तालुक्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गावातील पाणीटंचाई दूर करणे, भूजल पातळी वाढविणे आणि शेतीला बारमाही पाणी उपलब्ध करुन देणे हा या जलतारा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी रोटरी क्लबच्या सहकार्याने गावात जलसंधारण, पाणी अडवा-पाणी जिरवा, भूजल पुनर्भरण आणि विविध पाणी संवर्धन उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. मीनाक्षीताई रोंगे, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, रोटरी क्लबचे अध्यक्ष नवनाथ गुल्हाने, सचिव विशाल देशमुख, प्रकल्प प्रमुख मधुकर डोईफोडे, खडकलगावचे माजी सरपंच दिपक रोंगे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, बाजार समितीचे संचालक रविकांत साळुंखे, कांदलगावचे सरपंच प्रदीप नवले, विभाग प्रमुख दशरथ टेकाळे, रामेश्वर मांजरे, ग्रामसेवक घोळवे मॅडम, सचिन उकिरडे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ग्रामीण भागातील जलसंधारणाला चालना देणारा हा उपक्रम भविष्यात ताडसौंदणे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच “पाणी वाचवा, पाणी जिरवा आणि गाव समृद्ध करा” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.
Post Views: 4