जालना – “गुरूंकडून प्राप्त झालेले ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नसून ते जीवनात आचरणात आणण्यासाठी असते. विनय, सेवा, स्वाध्याय आणि संयम या गुणांचा स्वीकार करणारा शिष्यच गुरूंच्या शिकवणीचा खरा अधिकारी ठरतो,” असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले.
प्रवचनात त्यांनी गुरुपरंपरेतील महान संतांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे विवेचन करत गुरूंच्या आचरणातून मिळणाऱ्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. आगमाचे गाढ ज्ञान, कठोर तपश्चर्या आणि उच्च कोटीची साधना प्राप्त असूनही गुरूंनी कधीही अहंकाराला स्थान दिले नाही. उलट लहान साधू-साध्वींप्रती आदर, सेवाभाव आणि नम्रता जपत आदर्श संयमी जीवनाचा वस्तुपाठ समाजासमोर ठेवला, असे त्यांनी सांगितले.
महासती निर्मलाजी म.सा. म्हणाल्या की, गंभीर आजार, शारीरिक वेदना आणि प्रतिकूल परिस्थिती यांचाही गुरूंनी शांतचित्ताने स्वीकार केला. कठीण प्रसंगातही संयम, समता आणि धर्मनिष्ठा कायम ठेवत त्यांनी आपल्या आचरणातून साधनेचे सामर्थ्य जगासमोर उभे केले. “गुरूंचे जीवन हे प्रत्येक साधकासाठी प्रेरणास्थान आणि आत्मविकासाचे जिवंत विद्यापीठ आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात भौतिक सुखांच्या मागे धावताना माणूस अंतर्मनातील शांती गमावत आहे. अशा परिस्थितीत गुरूंनी दिलेले संस्कार, स्वाध्याय, आत्मशिस्त, सदाचार, सेवा आणि धर्माचरण यांचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन जगितल्यास व्यक्तिमत्त्व समृद्ध होऊन आत्मोन्नतीचा मार्ग सुकर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तपआराधनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
धर्मसभेदरम्यान एकूण २०९ भाविकांनी विविध तपांची आराधना केली. त्यामध्ये १ पोरसी – ३०, २ पोरसी – २, नवकारसी – ४९, दिवस चरम – ९, एकासन – ५०, एकलठाणा – ८, नीवी तप – १०, आयंबील – १८, १ उपवास – १४, अभिग्रह – ११, ५ उपवास – २, ६ उपवास – २ आणि ७ उपवास – ४ तपस्वींचा समावेश होता.
धर्मसभेला ध्यानयोगी आचार्य पूज्य शिवमुनिजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्ती, आगम गगनचंद्रिका, संयम सुमेरू, गुरुणीमैया महासाध्वी कौशल्याजी म.सा. ‘श्रमणी’ यांच्या प्रशिष्य तथा स्वर्ण संयमज्योती उपप्रवर्तिनी महासती प्रमिलाजी म.सा. यांच्या सुशिष्य तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा., तपचंद्रिका महासती नंदिनीजी म.सा., महासती उपमाजी म.सा., महासती उपासनाजी म.सा. तसेच महासती ऋषिताजी म.सा. (आदि ठाणा ५) यांची पावन उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने श्रावक-श्राविकांनी धर्मश्रवणाचा लाभ घेतला.
प्रवचनानंतर डॉ. गादिया यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर मंगलपाठाने धर्मसभेची सांगता झाली.
























