सोलापूर : महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीला होत असलेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त करत चौकशी समितीला दिलेली १५ दिवसांची मुदत संपूनही अपेक्षित प्रगती झालेली नाही.
नगरअभियंत्यांनी नैतिकतेच्या आधारावर पदापासून दूर राहावे. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मागील सर्वसाधारण सभेत नालेसफाईतील कथित घोटाळ्याचे पुरावे सभागृहात सादर करण्यात आले होते. त्यानंतर महापौरांनी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांनी चौकशी समिती नेमून १५ दिवसांची मुदत दिली मात्र या कालावधीत चौकशीत समाधानकारक प्रगती झालेली दिसत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे.
नगरअभियंत्यांच्या चौकशीप्रकरणी प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी. नगरअभियंत्यांनी नैतिकतेच्या आधारावर चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहावे, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली. चौकशीत निर्दोष ठरलात तर मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे मात्र तोपर्यंत नैतिकतेचे पालन करावे,असे ते म्हणाले.
दरम्यान, चौकशी समितीच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त आयुक्त विना पवार पवार यांची भेट घेतल्यानंतर चौकशीसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि वेळ अपुरा पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आवश्यक असल्यास मुदतवाढ घेऊन चौकशी पूर्ण करावी मात्र संपूर्ण प्रक्रिया लेखी स्वरूपात पारदर्शकपणे पार पाडावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
१५ दिवस संपले, चौकशी कुठे ?
आयुक्तही हतबल झाले आहेत का ?
महापालिका आयुक्तांनी चौकशी समिती नेमून १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र या कालावधीत चौकशीत नेमकी काय प्रगती झाली, याची कोणतीही स्पष्ट माहिती नाही. यावरून महापालिका प्रशासन या प्रकरणात गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला. नगरअभियंत्यांचे इतके वजन आहे का, की आयुक्तही हतबल झाले आहेत? काही दबाव असेल तर तो स्पष्ट करावा. आम्ही हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरणार असून दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार घेणार नाही. चौकशीत किती लाखांचा घोटाळा किंवा अपहार झाला, हे समोर येईल मात्र अद्याप चौकशीलाच सुरुवात झालेली नाही, असा गंभीर आरोप जाधव यांनी केला.
पालकमंत्र्यांशी केली चर्चा ; म्हणाले,
भ्रष्ट अधिकाऱ्याला सरकारचा पाठींबा नाही
या प्रकरणाची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही दिली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला सरकार पाठीशी घालणार नाही, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी व्यक्त केल्याचा दावा त्यांनी केला.