अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता स्मृतीभवन शंकरनगर येथे रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ग्रामीण कला, क्रीडा व संस्कृतीचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक व युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नियोजनातून मुलींच्या पारंपारिक गीतांचा रत्नाई पारंपारिक नागपंचमी समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रातील लोप पावत चाललेले सण, उत्सव, पारंपरिक कला आणि खेळ यांचा समृद्ध व सांस्कृतिक वारसा जतन व्हावा हा उद्देश या उपक्रमाचा आहे.
या स्पर्धेमध्ये सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर या सात शाखांचा सहभाग आहे.
प्रत्येक संघात सुमारे २० ते ५० कलाकार पारंपारिक गीतांचेच सादरीकरण करणार असून यासाठी त्यांना २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षीसही ठेवण्यात आली आहेत. सदरची स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत होणार असून ते केवळ निमंत्रितासाठी असून सर्वांसाठी याचे थेट प्रक्षेपण त्याच वेळी सुरू राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव उपस्थित होते.
Post Views: 6