सोलापूर – सोलापूरातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षकांची पुन्हा एकदा कसून पडताळणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेषतः सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र अथवा फेरपडताळणी प्रमाणपत्र घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांवर संशयाची छाया निर्माण झाली असून, संबंधित प्रमाणपत्रांची नव्याने तपासणी करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.
सोलापूर शासकीय रुग्णालयातील अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट उघडकीस आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आठ जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे अहिल्यानगर, नाशिक आणि नांदेडपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. यापूर्वी शिक्षक बदली प्रक्रियेत दिव्यांग संवर्गाचा लाभ मिळविण्यासाठी काही शिक्षकांनी गैरमार्गाने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याची तक्रार झाली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ४३ संशयित शिक्षकांच्या वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयाकडे पत्र पाठविले होते. त्यापैकी १८ शिक्षकांनी जे. जे. रुग्णालयातून दिव्यांगत्व पडताळणी करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला होता.
सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात सध्या ३९७ दिव्यांग शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी ३६२ शिक्षकांनी दिव्यांगत्व पडताळणी प्रमाणपत्र सादर केले असले, तरी ३५ शिक्षकांनी अद्याप पडताळणी पूर्ण केलेली नाही. याशिवाय सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून प्रमाणपत्र मिळविलेल्या काही शिक्षकांच्या कागदपत्रांबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम ९१ नुसार अपात्र व्यक्तीने दिव्यांगत्वाच्या नावाखाली शासकीय लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे या पडताळणी प्रक्रियेकडे संबंधित शिक्षकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.
यापूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनीही संशयित वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेरतपासणी मुंबईच्या सर जे. जे. समूह रुग्णालयामार्फत करण्याची शिफारस केली होती. विविध शिक्षक संघटनांनीदेखील पारदर्शक चौकशीची मागणी केली होती.
दरम्यान, बोगस प्रमाणपत्र रॅकेटच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र मिळविलेल्या सर्व शिक्षकांच्या नोंदींची संबंधित विभागामार्फत पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. या प्रक्रियेबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे मार्गदर्शनही घेण्यात येणार आहे.
या फेरतपासणीतून संशयित प्रमाणपत्रांचा उलगडा होणार का आणि गैरमार्गाने लाभ घेतलेल्या व्यक्तींवर कारवाई होणार का, याकडे आता जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोट
सर्व प्रकरणांची नियमानुसार फेरपडताळणी
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत उघड झालेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या विभागातील ज्या शिक्षकांनी या रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र किंवा पडताळणी प्रमाणपत्र घेतले आहे, त्या सर्व प्रकरणांची नियमानुसार फेरपडताळणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही, मात्र बनावट अथवा संशयास्पद प्रमाणपत्रे आढळल्यास शासनाच्या नियमांनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.”
— कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर