सांगोला – पंढरपूर आषाढी यात्रेच्या यशस्वी नियोजनाबद्दल पंचायत राज व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी बोराटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महासचिव विकास भोसले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय पाणसंडे, सचिव लिंगराज साखरे, सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, डॉ.संतोष जोगदंड उपस्थित होते.
पंढरपूर यात्रेदरम्यान राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, निवास, पाणी, आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांचे योग्य नियोजन करणे हे मोठे आव्हान होते. मात्र, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच राज्यातील विविध विकासकामे, ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला मिळणारी गती व डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही सकारात्मक चर्चा झाली. बदलत्या काळात डिजिटल पत्रकारिता अधिक प्रभावी होत असून, ग्रामीण आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यात डिजिटल माध्यमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.