सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादाला आता नवा राजकीय वळण प्राप्त झाले आहे. विद्यमान सभागृहाचे नाव बदलण्यापेक्षा नव्याने सभागृह उभारून त्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देणे अधिक उचित ठरेल, अशी भूमिका जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी मांडली.
जिल्हा परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना मोहिते-पाटील म्हणाले, यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान सभागृहाला एक नाव दिले आहे. त्यामुळे आधीचे नाव बदलून त्याठिकाणी दुसरे नाव देणे कितपत योग्य आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. वाजपेयी यांच्या नावाला आपला कोणताही विरोध नसून, त्यांचा सन्मान राखण्यासाठी नव्या सभागृहाला त्यांचे नाव देणे हा अधिक योग्य पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘सत्ता येते आणि सत्ता जाते’ हा अटल बिहारी वाजपेयी यांचा विचार होता, याची आठवण करून देत मोहिते-पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्षपणे संयमाचा सल्ला दिला. सध्या जिल्हा परिषदेत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी नामांतराच्या विषयाकडे राजकीय दृष्टीने न पाहता व्यापक विचार करून निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विकासकामांमध्ये सर्व सदस्यांना समान निधी आणि समान सन्मान मिळणे आवश्यक असल्याचेही मोहिते-पाटील यांनी सांगितले. नामांतराच्या मुद्द्यावरून सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्यापेक्षा सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याने जिल्हा परिषद वर्तुळातील राजकीय वातावरण तापले असतानाच मोहिते-पाटील यांच्या भूमिकेमुळे या वादाला तिसरा पर्याय मिळाला आहे. विद्यमान नाव बदलायचे की नव्या सभागृहाला वाजपेयींचे नाव द्यायचे, यावर आता जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
Post Views: 21