सोलापूर : एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे प्रथम वर्षातील नवागत विद्यार्थ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, शैक्षणिक रचना, उपलब्ध सुविधा, व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यवृद्धी आणि सामाजिक जबाबदारी यांची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
पहिल्या दिवशी प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. जनरल सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. के. एस. पाटील यांनी प्रथम वर्षाची शैक्षणिक रचना तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सहाय्य सुविधांची माहिती दिली.
प्रा. डॉ. एस. एच. पवार, संचालक, सी-आरटीडी यांनी ‘विकसित भारत-२०४७’ या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना देशाच्या विकासात युवा अभियंत्यांची भूमिका अधोरेखित केली. सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी संविधानिक कर्तव्ये, सामाजिक जबाबदारी, वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी आयोजक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अभियांत्रिकी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विचारसरणी, कौशल्य विकास, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत ज्ञानाचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दुपारच्या सत्रात डॉ. एम. एस. देशपांडे यांनी समाजाच्या जडणघडणीत अभियंत्यांची भूमिका आणि नाविन्यपूर्ण विचारांचे महत्त्व विशद केले. महाराष्ट्रातील युवा राज्यस्तरीय क्रिकेट पंच तथा प्रेरणादायी वक्ते अनिश सहस्रबुद्धे यांनी योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, समर्पण तसेच पालक आणि शिक्षकांप्रती आदर या मूल्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रशासकीय विभाग, ग्रंथालय तसेच विविध शैक्षणिक सुविधांची माहिती देण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. एस. एन. शिंदे यांनी निर्णय, दिशा, समर्पण, निष्ठा आणि दृढनिश्चय या जीवनातील पाच महत्त्वपूर्ण सूत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. यावेळी मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची सर्वांगीण ओळख व्हावी यासाठी आभासी परिसर दर्शनाचे आयोजन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात ‘चिन्ह ओळखा’ आणि ‘नवागत विद्यार्थी गौरव’ यांसारख्या मनोरंजक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. यामध्ये सौरभ फोपळे आणि साक्षी पांढरे यांनी अनुक्रमे उत्कृष्ट नवागत विद्यार्थी आणि उत्कृष्ट नवागत विद्यार्थिनीचा बहुमान पटकावला.
सायंकाळी झालेल्या समारोप समारंभास प्राचार्य डॉ. एस. डी. नवले आणि विभागप्रमुख डॉ. के. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या समन्वयकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रा. एस. बी. भोसले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.






















