सोलापूर : वारंवार सूचना देऊन आणि तब्बल आठ महिन्यांची मुदत देऊनही मुद्रांक शुल्क भरून नोंदणीकृत करारनामा करून न घेतल्याने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) सोबतचा भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुलाचा करार रद्द केला आहे. तसेच ४८ तासांच्या आत स्टेडियमचा ताबा महापालिकेकडे देण्याचे निर्देश एमसीएला देण्यात आले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी क्रीडा संकुलाबाबत ४ सप्टेंबर २०२५ रोजी महापालिका आणि एमसीएमध्ये केवळ ५०० रुपयांच्या नोटरीवर करार करण्यात आला होता. त्याच दिवशी पार्क स्टेडियमचा ताबाही एमसीएकडे देण्यात आला होता. मात्र, या करारासाठी नियमानुसार सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.त्यानंतर संबंधित करारनामा मागवून घेऊन त्याचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार सुमारे साडेतीन कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, एमसीएकडून मुद्रांक शुल्कमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेने एमसीएला वारंवार नोटिसा बजावत मुद्रांक शुल्क भरून नोंदणीकृत करारनामा करून घेण्याचे निर्देश दिले.
यासाठी एमसीएला तब्बल आठ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुद्रांक शुल्क निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याचे कारण देत एमसीएकडून नोंदणीकृत करारनामा करून घेण्यात आला नाही. दिलेल्या मुदतीत आवश्यक कार्यवाही न झाल्याने आयुक्तांनी अखेर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ताबा देण्याचे निर्देश
करार रद्द केल्यानंतर महापालिकेने एमसीएला ४८ तासांच्या आत स्टेडियमचा ताबा महापालिकेकडे सोपविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या क्रीडा संकुलाच्या कराराचा विषय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे.
जबाबदारी एमसीएचीच : डॉ. ओम्बासे
महापालिकेकडून करारपत्र एमसीएने करून घेतले असल्याने मुद्रांक शुल्क भरून नोंदणीकृत करारपत्र करून घेण्याची जबाबदारी त्यांचीच होती. शुल्कमाफीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी महापालिकेने आठ महिन्यांची मुदतही दिली होती. मूल्यांकन करून मुद्रांक शुल्क निश्चित करून ते भरण्याची जबाबदारीही एमसीएची होती. नोंदणीकृत करार करून न घेतल्याने करार रद्द करण्यात आला, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले आहे.
—-
Post Views: 15