सोलापूर येथील जिजामाता पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आलेल्या क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी आगामी राष्ट्रकुल व ऑलिम्पिक स्पर्धा, कबड्डीचा समावेश आणि क्रीडा संस्कृतीच्या विस्ताराबाबत सखोल भाष्य केले. २०३० मध्ये भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार असून, २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठीही भारत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कबड्डीला ऑलिम्पिकचा दर्जा मिळावा आणि देशातील प्रत्येक कुटुंबाने खेळासाठी स्वतंत्र तरतूद करावी, असा स्पष्ट निर्धार व सल्ला त्यांनी व्यक्त केला.
*कबड्डीचे शताब्दी वर्ष व ऑलिम्पिकचे स्वप्न*
भारतात २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यास यजमान देशाचा खेळ म्हणून कबड्डीचा समावेश व्हावा, यासाठी क्रीडा भारती प्रयत्नशील आहे. १९३६ मध्ये बर्लिन (जर्मनी) येथे कबड्डीचा प्रदर्शनीय सामना झाला होता. त्या घटनेला २०३६ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असून, कबड्डीच्या या शताब्दी वर्षात तिला ऑलिम्पिकचे व्यासपीठ मिळावे, हा या प्रयत्नामागचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक गावात कबड्डीचे सामने आयोजित करण्यास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आली आहे.
*विद्यापीठीय चर्चासत्रे व ‘स्पोर्ट्स बजेट’चा सल्ला*
क्रीडा भारतीच्या आगामी योजनांची माहिती देताना राज चौधरी म्हणाले की, देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ‘खेलो मे भारतीय दृष्टी’ या विषयाचे विश्लेषण करण्यासाठी सेमिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.
कौटुंबिक पातळीवर क्रीडा संस्कृती रुजवताना त्यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला: “आपल्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालण्यासाठी कुटुंबप्रमुख महिन्याचे बजेट तयार करत असतो. त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने खेळासाठी स्पोर्ट्स बजेट तयार करावे.”
*‘स्वस्थ भारत – समर्थ भारत’ साठी क्रीडा भारतीचा प्रवास*
देशी खेळांना प्रोत्साहन देणे आणि समाजात खेळ व राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे, या उद्देशाने क्रीडा भारती कार्यरत आहे. पुण्यातील दामुअण्णा दाते आणि श्रीपती शास्त्री यांच्या पुढाकाराने ९ सप्टेंबर १९९० रोजी ‘क्रीडा भारती’ हे नाव निश्चित झाले. १९९१-९२ मधील चर्चा व नोंदणीनंतर ४ डिसेंबर १९९२ रोजी महाराष्ट्र शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आणि हनुमान जन्मोत्सवापासून संस्थेच्या कामाला विधिवत सुरुवात झाली.
तालुका, जिल्हा आणि प्रांत स्तरावरून पुढे जात आज संस्थेचा विस्तार देशभरातील अनेक प्रांत आणि शेकडो जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. दिवंगत माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने देशातील ३० राज्यांमध्ये 500 पेक्षा जास्त जिल्ह्यात व 45 प्रांतामध्ये कामकाज विस्तारले असून, राज्य व जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांच्या चमू अविरत कार्यरत आहेत. २०१५ मध्ये संस्थेच्या उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही झाली.
सोलापूर जिल्ह्यातून अध्यक्ष डॉ. विलास हरपाळे, उपाध्यक्ष अरुण उपाध्ये, अनिल गिराम, जिल्हा मंत्री राजेश कळमणकर, सहमंत्री डॉक्टर उज्वल मलजी यांच्यासह 16 जणांची कार्यकारणी कार्यरत आहे.
‘क्रीडा वृत्या सदाचारो राष्ट्रदेवो कृति युवा’ आणि ‘क्रीडा से निर्माण चरित्र का, चरित्र से निर्माण राष्ट्र का’ या ध्येयवाक्यांद्वारे क्रीडा भारती खेळांच्या माध्यमातून चारित्र्य आणि राष्ट्रनिर्माण साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे.
—-
*प्रमुख उपक्रम, अधिवेशने व ध्येयवाक्ये*
-‘जिथे गाव तिथे क्रीडांगण’ या संकल्पनेतून वय, लिंग वा शिक्षणाचा भेद न करता दररोज खेळण्यासाठी क्रीडा केंद्रांचे संचालन.
- मकर संक्रांती ते रथ सप्तमी दरम्यान सामूहिक सूर्यनमस्कार आणि २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन.
– खेळाडू घडवणाऱ्या मातांचा गौरव करणारा ‘जिजामाता सन्मान’, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्रीडा ज्ञान परीक्षा तसेच २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन.
– १९९७ मध्ये पुणे ते मुंबई ‘अल्ट्रा रिले मॅरेथॉन’, औरंगाबाद येथे डॉ. हेडगेवार चषक कबड्डी स्पर्धा तसेच क्रीडा विद्यापीठ व शालेय अभ्यासक्रमातील खेळाचा समावेश यावर चर्चासत्रे. रतलाम (२०१२), जयपूर (२०१५), धनबाद (२०१८) आणि लखनौ (२०२२) येथील राष्ट्रीय अधिवेशनांतून ‘सक्षम महिला – निर्भय महिला’ आणि ‘स्वस्थ भारत – समर्थ भारत’ या मोहिमांना बळ.
—–





















