बार्शी – ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटी सदस्य, जुलूस कमिटीच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक बुधवार दि. १९ रोजी घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये जुलूस कमिटीच्या सदस्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन, जुलूस शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी चर्चा करण्यात आली. जुलूसदरम्यान “नो डीजे, नो डॉल्बी’चे पालन करुन केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. तसेच कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह अथवा भावना दुखावणाऱ्या घोषणा देऊ नयेत, याबाबत आयोजकांना सूचित करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान गर्दीचे नियोजन व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जुलूसमध्ये आवश्यक संख्येने स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार यांनी बार्शी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद सणाच्या शुभेच्छा देवून हा पवित्र सण शांतता, सलोखा व बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
Post Views: 5