सोलापूर : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर अवलंबून न ठेवता प्रत्यक्ष प्रयोगातून शिकण्याची संधी मिळावी, यासाठी जय अकॅडमीकडून शहरातील पहिले ‘स्टेम प्रयोगशाळा’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जय अकॅडमीचे रतन अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रयोगशाळा असून, शनिवार आणि रविवार या दिवशी उपक्रमाचे सत्र होणार आहेत. या उपक्रमात एकूण ३५ सेशन ठेवण्यात आले असून, २३ ऑगस्ट रोजी प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, विविध कृती आणि प्रकल्पांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची माहिती देण्यात येणार आहे.प्रयोगशाळेत २०० हून अधिक मॉडेल्स उपलब्ध असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संकल्पना प्रत्यक्ष समजून घेता येणार आहेत. प्रयोग करताना प्रश्न विचारणे, चुका करणे, त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागेल. यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळून तर्कशक्ती, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित होण्यास मदत होईल.
रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय प्रोग्रामिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रा. प्रतीक माळी उपस्थित होते.
—
Post Views: 60