सोलापूर : रक्षाबंधनाचे औचित्य साधून ‘लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी’ हा अनोखा उपक्रम सोलापुरात राबविण्यात येत असून, सोलापुरातून एक लाख राख्या गोळा करून शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
हा उपक्रम २४ ते २६ ऑगस्ट २०२६ दरम्यान सोलापुरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन बहिणींकडून राख्या जमा करण्यासह विविध ठिकाणी राखी संकलनासाठी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत.
राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. संकलित राख्या प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहेत.
या उपक्रमातून शिवसेनेची विचारधारा, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्याची माहिती बहिणींपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजक प्रकाश राठोड यांनी सांगितले.
लकी ड्रॉचे आकर्षण
संकलित राख्यांमधून तीन बहिणींच्या राख्यांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात येणार असून, विजेत्या बहिणींना आकर्षक भेटवस्तू व विशेष बक्षीस देण्यात येणार आहे.
या उपक्रमात सोलापुरातील सर्व बहिणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लाडक्या भावाला राखी पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 20