सोलापूर : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी संस्कारांची ‘मुळे’ घट्ट असणे आणि स्वप्नांचे ‘पंख’ पसरून उंच भरारी घेणे आवश्यक आहे. सतत शिकण्याची भूक ठेवा आणि नम्र राहा. तुमच्यात शिकण्याची वृत्ती जिवंत असेपर्यंत तुमची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. असे विचार सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक आणि जामश्री जामश्री रियल्टीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी यांनी विद्यार्थी आणि पालकांना संबोधित करताना मांडले. एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘विश्वारंभ २०२६’ या इंडक्शन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या शुभाशीर्वादाने आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा. स्वाती कराड चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राजेश दमाणी, जामश्री रियल्टीचे उपाध्यक्ष अंकित दमाणी, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. गोपळकृष्ण जोशी, कुलसचिव प्राणेश मुरनाळ, प्रा. अनंत चक्रदेव, रजिस्टार (इव्हॅल्युएशन अँड असेसमेंट) प्रा. प्रभा कासलीवाल आणि विविध शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
विद्यापीठातील प्रयोगशाळा आणि डिझाइन सेंटरचे कौतुक करताना राजेश दमाणी पुढे म्हणाले की, “केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिक शिक्षणावर भर द्यावा, चुकांना न घाबरता त्या प्रगतीच्या पायऱ्या बनवाव्यात आणि दररोज स्क्रीन टाईम कमी करून पुस्तकांचे वाचन करावे. असे आहावन त्यांनी विद्यार्थ्यांना केले
माईर्स एमआयटीच्या मूल्याधिष्ठित शैक्षणिक परंपरेचा उल्लेख करत कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न धावता नवनिर्मिती, कौशल्य विकास आणि समस्या निवारणावर भर देऊन आयुष्याच्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करावे. या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ आणि पालकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पालकांनी विद्यापीठाच्या संपर्कात राहण्यासोबतच आपल्या पाल्याशी दररोज संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंकित दमाणी यांनी जामश्री ग्रुपच्या प्रवासावर आणि काळानुरूप झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकला. त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव प्राणेश मुरनाळ यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना विद्यापीठाची तत्त्वे, मूल्यव्यवस्था, शैक्षणिक दृष्टिकोन आणि उपलब्ध विविध संधींची माहिती दिली.
Post Views: 21