सोलापूर – प्लास्टिकचा वापर हा केवळ स्वच्छतेचा प्रश्न राहिलेला नसून तो पर्यावरण आणि मानवी आरोग्यासमोरील गंभीर आव्हान बनला आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता कमी होणे, जलस्रोत दूषित होणे आणि पशुपक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६’च्या जनजागृती अभियानाच्या सहाव्या दिवशी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सोलापूरकडून नागरिकांना प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
‘प्लास्टिक स्लो पॉइझन आहे; हळूहळू पृथ्वीचा नाश करते’, असा प्रभावी संदेश देत प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिकचे सूक्ष्म कण अर्थात मायक्रोप्लास्टिक्स पाणी, अन्न आणि पर्यावरणाच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या संपर्कात येत असल्याने प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे या अभियानातून अधोरेखित करण्यात आले.
प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या वस्तूंचा वापर कमी करण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात छोटे पण परिणामकारक बदल करण्याची गरज आहे. बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत ठेवणे, प्लास्टिकच्या पिशवीऐवजी पर्यायी वस्तूंचा वापर करणे, घरातील प्लास्टिक कचरा इतर कचऱ्यापासून वेगळा करणे आणि शक्य तिथे पुनर्वापराला प्राधान्य देणे, अशा सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘कमी प्लास्टिक, अधिक आयुष्य’ हा संदेश घराघरात पोहोचवून पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी हा संदेश गावातील विविध ग्रुपवर शेअर करून जनजागृती अभियानाला हातभार लावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छते विषयक जनजागृती उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.
चौकट
कापडी पिशवीची सवय, प्लास्टिकमुक्त भविष्यासाठी पहिली पायरी
प्लास्टिकमुक्ती केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी शक्य नसून त्यासाठी गावागावातील नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘सिंगल-युज प्लास्टिकला स्पष्ट नकार’ देत पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे.