सोलापूर : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी सोलापूर शहरात पारंपरिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि सामाजिक सलोख्याच्या संदेशात साजरी करण्यात आली. विजापूर वेस येथून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांसह लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विजापूर वेस येथे सकाळी ९ वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडा फडकावून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर विविध मंडळांकडून आकर्षक सजावट, स्वागत कमानी आणि धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जीवन व शिकवणीवर आधारित ‘नात-ए-पाक’ सादर करत विविध मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.
मिरवणुकीत शहर काजी मुफ्ती अमजदअली सय्यद, उत्सव अध्यक्ष समीर शेख व कम्मो शेख,आरिफ शेख, राज्य अल्पसंख्याक सदस्य वसीम बुऱ्हाण,एम.डी.शेख, राजू कुरेशी,यु.एन.बेरिया, मकबूल मोहोळकर,मतीन बागवान,शकील मौलवी, पिरअहमद शेख,यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.
धार्मिक उत्साहासोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव, धार्मिक एकोपा आणि राष्ट्रीय सद्भावनेचा संदेश देत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव सोलापुरात शांततेत आणि उत्साहात संपन्न झाला.
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




















