वैराग – बार्शी तालुक्यातील मौजे सारोळे ग्रामपंचायत कारभारातील कथित गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि विकासकामांचा खोळंबा याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामसेवकांच्या सततच्या गैरहजेरीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून, ३१ ऑगस्ट २०२६ पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
२७ ऑगस्टच्या ग्रामसभेवर बहिष्काराचे पत्र
सारोळे येथील रहिवासी सुधाकर बजरंग जाधव व अन्य ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी (पंचायत समिती, बार्शी) यांना २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रानुसार, २७ ऑगस्ट रोजी नियोजित ग्रामसभेला ग्रामसेवक जाणीवपूर्वक अनुपस्थित राहत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामसेवकांऐवजी उपस्थित राहणारे इतर पदाधिकारी ग्रामस्थांना योग्य ती माहिती देऊ शकत नाहीत. ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झालेला असून, ग्रामसेवकांची रजा नामंजूर करावी आणि ते उपस्थित राहतील त्याच दिवशी सभा घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामसेवक अनुपस्थित राहिल्यास सर्व ग्रामस्थ या सभेवर बहिष्कार घालणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ग्रामस्थांच्या मुख्य मागण्या व तक्रारी:
१. उपोषण व चौकशीची मागणी: आमचे गाव नागरी सोयी-सुविधांपासून वंचित असून ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची व गैरप्रकारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात यावी.
२. विकासकामांचा खोळंबा: गावातील उघड्या गटारीचे काम अपूर्ण असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे.
३. शाळा व क्रीडांगण समस्या: जिल्हा परिषद शाळेचे मैदान, कंपाउंड वॉल आणि पेव्हिंग ब्लॉकचे काम अद्याप अपूर्ण आहे.
४. निधी वापराची माहिती: प्रशासनाकडून गावात कोणत्या कामांसाठी किती निधी वापरण्यात आला, याची सविस्तर माहिती बारव (विहीर) व फलकांवर जाहीर करण्यात यावी.
५. माहिती अधिकार अर्ज: माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती वेळेत दिली जात नसून अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
३१ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
ग्रामपंचायतीचा कारभार शिस्तबद्ध आणि पारदर्शक व्हावा, तसेच नागरी सोयी-सुविधांची तातडीने पूर्तता व्हावी, यासाठी ३१ ऑगस्ट २०२६ (वार: सोमवार) पासून ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी (सोलापूर), पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण), DYSP साहेब (बार्शी विभाग), पोलीस निरीक्षक (बार्शी शहर पोलीस स्टेशन) आणि गटविकास अधिकारी (बार्शी) यांना पत्राच्या प्रती पाठवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.