सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शाळांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांची ‘मॉडेल स्कूल’ म्हणून निवड करून त्यांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. त्यामुळे अकरा तालुक्यांतील सुमारे ५५ जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूलच्या धर्तीवर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार आता या उपक्रमाला प्रत्यक्ष स्वरूप देण्यात येत आहे. पंधरावा वित्त आयोग, पीएम श्री तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा या शाळांच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे. याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मॉडेल स्कूलमध्ये केवळ रंगरंगोटी किंवा इमारतीच्या सुशोभीकरणावर भर न देता शाळेच्या भौतिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञानविषयक सुविधांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. शाळेच्या इमारतीची स्थिती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इतर सुविधांची तपासणी करून कमतरता असलेल्या बाबींची पूर्तता केली जाणार आहे.
खासगी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांच्या धर्तीवर या शाळांच्या अंतर्गत व बाह्य स्वरूपातही आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि अध्ययनास पोषक वातावरण मिळावे, यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
चौकट
एआयच्या माध्यमातून अध्यापन
मॉडेल स्कूलचा महत्त्वाचा भाग म्हणून अत्याधुनिक अध्ययन-अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित शैक्षणिक साधनांचा वापर करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत तंत्रज्ञानाधारित आणि आधुनिक पद्धतीने शिकण्याची संधी मिळणार आहे.याशिवाय जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्पोकन इंग्लिश कोर्स राबविण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे मॉडेल स्कूलचा भर केवळ शाळेच्या इमारतीच्या विकासावर न राहता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीवरही राहणार आहे.
चौकट
आधी पाहणी, मग सुविधांची पूर्तता
प्रत्येक तालुक्यातील संबंधित गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना मॉडेल स्कूलच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडलेल्या शाळांमध्ये सध्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या सुविधांची कमतरता आहे, याची माहिती संकलित करून त्यानुसार विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे उपलब्ध निधीचा गरजेनुसार आणि परिणामकारक वापर करण्यावर भर राहणार आहे.
चौकट
‘फक्त इमारत नव्हे, तर संपूर्ण शाळेचा कायापालट’
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. पायाभूत सुविधांसोबत डिजिटल शिक्षण, एआयचा वापर आणि इंग्रजी संभाषण कौशल्यावर भर दिल्याने या शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मॉडेल केंद्रे ठरण्याची अपेक्षा आहे.
कोट
“जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळेची इमारत, भौतिक व शैक्षणिक सुविधा यावर विशेष भर राहणार आहे. यासाठी पंधरावा वित्त आयोग, पीएम श्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेच्या निधीचा आधार घेतला जाणार आहे. संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद
Post Views: 12