बार्शी – तालुक्यातील चारे गाव परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेजर पापा यांच्या मालकीच्या म्हशीच्या रेडकूवर बिबट्याने हल्ला करुन त्याला जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन हल्ल्याची पद्धत, रेडकूच्या शरीरावरील जखमा आणि नखांच्या खुणांची तपासणी केली. त्यावरुन संबंधित प्राणी बिबट्या असल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी जात असताना चारे गावातील काही नागरिकांना वाघ दिसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. माहिती मिळताच बार्शी वनविभागाचे वनपाल आरजू पिरजादे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच चारे गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर मंगळवार, दि. १ सप्टेंबर रोजीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळासह चारे परिसराची पाहणी केली.
यापूर्वीदेखील बार्शी तालुक्यातील पांगरी, चारे तसेच येडशी परिसरात बिबट्या दिसून आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा बिबट्याचा वावर आढळल्याने शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने व पोलिसांनी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वनपाल पिरजादे यांनी येडशी बार्शी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, शेतात जाताना बॅटरीचा-काठीचा वापर करावा, लहान मुले व जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
बिबट्या आढळल्यास त्याचा पाठलाग करु नये किंवा गर्दी करुन त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता तत्काळ वनविभाग किंवा पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 11