पंढरपूर – एनसीएमसी कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट घेण्याची सक्ती मागे घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
बोगस,खोट्या ओळखपत्राद्वारे सवलती घेण्याचे प्रमाण वाढल्याने खऱ्या/पात्र प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एनसीएमसी कार्ड हे सवलतीसाठी अधिकृत ओळखपत्र म्हणून समजण्यात येईल,त्यासाठी कार्ड काढून घेण्याची मोहीम महामंडळामार्फत सुरू करण्यात आली.त्यास प्रवाशांनीही १९९/-रु.शुल्क भरून प्रतिसाद दिला.
बॅलन्स टाकल्यास एसटी तिकीट काढण्यासाठीही त्याचा उपयोग करता येईल असे सांगण्यात आले होते.
सरकारने आता एनसीएमसी कार्डावर बॅलन्स टाकण्याची सक्ती केली आहे.ती अन्यायकारक,चुकीची आहे.एनसीएमसी कार्ड म्हणजे प्रवाशांचे अधिकृत ओळखपत्र आहे.बोगस आधारकार्ड द्वारे सवलती घेतल्या जात होत्या त्यामुळे खरे सवलतधारक कळण्यासाठी हे कार्ड काढण्याचा मुख्य हेतू होता व आहे.तो योग्य आहे तथापि त्यावर बॅलन्स टाकण्याची व त्यावरूनच प्रवास सवलती घेण्याची सक्ती योग्य नाही. बॅलन्स टाकणे व त्याद्वारे तिकीट घेणे ऐच्छिक असले पाहिजे.
यावर १००/-चा बॅलन्स टाकल्यावर जीएसटी सुमारे १२ टक्के कट होऊन रक्कम जमा होते.म्हणजे मागील दाराने १२ टक्के तिकीट दरवाढ केल्यासारखी आहे.
ही बाब म्हणजे महिला व जेष्ठ नागरिक प्रवाशांची एसटी प्रवासात ‘सवलत’ देण्याच्या नावाखाली नवी डोकेदुखी निर्माण केलीय.
सवलतीसाठी १९९ रु. चं स्मार्ट कार्ड,त्यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स असणं आवश्यक आणि बॅलन्स संपला की पुन्हा रिचार्ज अशी ही डोकेदुखी आहे.
ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक डिजिटल साक्षर नाहीत,काही निरक्षर आहेत. त्यांना कार्ड घेणं, रिचार्ज करणं, बॅलन्स तपासणं यासाठी प्रत्येक वेळी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे.
सरकारने त्यांना एसटी प्रवासात सवलत दिली पण असले डिजिटल अडथळे निर्माण करुन त्यांची थट्टाच केली आहे.सवलत देताना ज्येष्ठ नागरिकांच्या,महिलांच्या अडचणी वाढवू नयेत,अन्यथा ‘सवलत नको पण तुमच्या नियमांना आवरा’ असं म्हणण्याची वेळ या ज्येष्ठ सवलतधारी
प्रवाशांवर येत आहे.
एक प्रकारे ही लूटच आहे.यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे. तरी ही सक्ती रद्द करून बॅलन्स टाकणे ऐच्छिक ठेवावे या मागणीचा शासन गांभीर्याने व सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून
व्यक्त केली जात आहे.
Post Views: 8