सोलापूर : न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची लेखी माहिती देऊनही सोलापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून वादग्रस्त घरजागेची विभागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्यापती श्रीनिवास गुंडला यांनी लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत गुंडला यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. जोडभावी पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक ९२०५/२४४ येथील सुमारे १८५.२० चौरस मीटर मिळकतीचा हा वाद आहे. मिळकतीची प्रत्यक्ष वाटणी झालेली नसतानाही मालमत्ता कर नियमित भरला जात होता. दरम्यान, विभागणीचा प्रश्न न्यायालयात गेल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली होती. १८ जून रोजी प्रस्तावित नावनोंदणी व विभागणीस हरकत घेण्यात आली होती. तसेच १९ जून रोजी कोणतीही विभागणी करू नये, अशी लेखी नोटीसही पाठविण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.मात्र, हरकत आणि न्यायालयीन वादाची माहिती असतानाही संबंधित कर निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने विभागणी केल्याचा आरोप गुंडला यांनी केला आहे. १९ ऑगस्ट रोजी स्पेशल नोटीस देण्यात आली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तपासणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
Post Views: 7