सोलापूर : पारंपरिक संस्कृती, ग्रामीण जीवनपद्धती आणि श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने आदि जांब मुनी मराठी शाळा व कै. काशिबाई शंकरराव इंडे हायस्कूल, बाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात ‘चुलीवरील भाकरी’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी चुलीवर भाकरी करण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पारंपरिक पद्धतीने चूल पेटविणे, पीठ मळणे, भाकरी थापणे आणि ती चुलीवर भाजणे याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. ग्रामीण जीवनातील साधेपणा, कष्ट आणि स्वावलंबन यांची ओळख विद्यार्थ्यांना या माध्यमातून झाली.
निसर्गाच्या सान्निध्यात एकत्रितपणे चुलीवर तयार केलेली गरमागरम भाकरी आणि पिठल्याचा आस्वाद घेताना विद्यार्थ्यांनी जेवणाचा तृप्त आनंद अनुभवला. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या अन्नाची चव विद्यार्थ्यांसाठी विशेष आनंददायी ठरली.
या उपक्रमामागील संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये कष्टाची जाणीव, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सहकार्य आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख निर्माण करणे ही होती. आधुनिक जीवनशैलीमध्ये लोप पावत चाललेल्या चुलीवरील स्वयंपाकाच्या पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि उपक्रमाची परिसरातही चर्चा झाली.
विशेष म्हणजे, या उपक्रमाला पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला. पालकांनी विद्यार्थ्यांना भाकरी करण्यासाठी मार्गदर्शन केले. शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरला. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष कृतीतून जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक संतोषकुमार घोडके, मुख्याध्यापक विश्वास गजबार, गोवर्धन माने, देविदास माने, गीतांजली कोल्हे, रेश्मा शेख, शिवकांता सुरवसे, जनाबाई कोथिंबीरे, सोनाली जगताप, अजुश्री ओतारे, दिपाली कुलकर्णी सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला, मंगल माने मावशी तसेच परिसरातील पालकांनी सहकार्य केले.
‘चुलीवरील भाकरी’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद मिळाला नाही, तर कष्टाचे महत्त्व, श्रमाची प्रतिष्ठा, सहकार्याची भावना आणि आपल्या मातीतल्या संस्कृतीशी असलेले नाते यांचीही जाणीव झाली. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणारा आणि संस्कारक्षम अनुभव ठरला.




















