तुळजापूर : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र, सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा एक विशेष आणि स्नेहपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी, तुळजापूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा सोहळा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गुतेकर, पोलीस उपनिरीक्षक भागवत वाघ, तसेच एकता महिला मंचचे प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्यासह महिला पोलीस कॉन्स्टेबल कानोपात्रा तेली, अन्नपूर्णा पांचाळ, सुनीता कदम, विद्या गटकूळ, राणी पौळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी एकता महिला मंचच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार, जिल्हा प्रवक्ता रंजना गवळी, तालुका प्रमुख कविता दशवंत, तुळजापूर तालुका प्रमुख रोहिणी डाके, तालुका पदाधिकारी वसुधा कुंभार, राजनंदिनी हाके, जयश्री संकपाळ, लक्ष्मी संकपाळ, सुरेखा कोळी, सुखंनंदा सुरवसे, मथुरा दशवंत व अन्य सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे म्हणाले, “तुळजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये ‘एकता महिला मंच’च्या माध्यमातून पोलीस बांधवांना व कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपण आमचा आनंद द्विगुणीत केला आहे. महिला मंचचा हा सामाजिक उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, या व्यासपीठाच्या भावी वाटचालीस व सामाजिक उपक्रमांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रवक्ता रंजना गवळी यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालन तुळजापूर तालुका प्रमुख रोहिणी डाके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हाप्रमुख लक्ष्मी सुतार यांनी मानले. अत्यंत आपुलकीच्या आणि उत्साही वातावरणात हा रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला.