नळदुर्ग : नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी (दि. ३) काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह किल्ल्यातील उपली बुरुज परिसरात टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य पौळ यांचा मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा व क्रांती गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही मुलींवर नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पौळ या आपल्या तीन मुलांसह किल्ला पाहण्यासाठी नळदुर्ग येथे आल्या होत्या. दुपारी एक ते दोनच्या सुमारास त्या मुलांसह उपली बुरुज परिसरात गेल्या. त्यानंतर घडलेल्या या घटनेत अश्विनी आणि अजिंक्य यांचा मृत्यू झाला, तर वीरा व क्रांती गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच किल्ल्याचे इन्चार्ज नागनाथ गवळी यांनी पोलिसांना कळविले. नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अख्तर सय्यद आणि बीट अंमलदार खलील शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेमागील कारणाचा शोध सुरू
अश्विनी पौळ या मुंबई येथे एमएसएफमध्ये नोकरीला होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरून नोकरीचा राजीनामा दिल्याचे समजते. मागील तीन महिन्यांपासून त्या तीन मुलांसह माहेरी, व्हंताळ (ता. उमरगा) येथे राहत होत्या. त्यांचे वडील शिक्षक असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही आत्महत्या आहे की घटनेमागे अन्य काही कारण आहे, यासह सर्व शक्यता तपासल्या जात असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेनंतर नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी किल्ला संगोपन योजनेअंतर्गत किल्ल्याची व्यवस्था युनिटी मल्टीकॉन्स कंपनीकडे असताना उपली बुरुजासह धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र, सध्या किल्ल्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनेमुळे नळदुर्ग शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























