माढा : रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजयकुमार श्रीमंत भोसले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. घनश्याम हराळे होते, तर श्री. पांडुरंग भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संजयकुमार भोसले यांनी शिक्षकांचे समाज व राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित केले. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा आणि समाज परिवर्तनाचा आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची सांगड घालून विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी गुणवंत शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. सतीश घाडगे (वरिष्ठ विभाग) प्रा. महेश भोसेकर (कनिष्ठ विभाग) श्री. सुहास जवंजाळ (कार्यालयीन कर्मचारी) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन स्टाफ वेल्फेअर समितीचे प्रा. अमोल मोरे, डॉ. रविराज कांबळे यांनी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांच्या मागदर्शनाखाली केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अलका घोडके यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. कैलास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 30