टेंभुर्णी – शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत असून, उजनी वसाहत येथून अज्ञात चोरट्याने तब्बल २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विजय मारुती साळुंखे यांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरातील दुचाकीधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साळुंखे यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (आरटीओ क्रमांक एमएच ४५ एएस ४५१८) ही दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान उजनी वसाहत, टेंभुर्णी येथून चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय मोटरसायकल लबाडीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मोटरसायकलची किंमत सुमारे २० हजार रुपये असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी टेंभुर्णी पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या काही वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले होते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद असतानाच गेल्या पंधरा दिवसांत टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोरून निवृत्त पोलीस कर्मचारी सुधाकर जाधव यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता उजनी वसाहतीतून पुन्हा स्प्लेंडर चोरीला गेल्याने दुचाकी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या मोटरसायकली सुरक्षित ठिकाणी पार्क करून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास टेंभुर्णी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक १३२ सोमनाथ गायकवाड करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस नाईक १२०४ दाडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
Post Views: 7