सोलापूर : पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहनसाठी ग्रीन बिल्डिंगला करसवलत, अग्निशमन दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करणे आणि शहरातील वृक्षसंवर्धनासाठी सक्षम यंत्रणा उभारणे अशा तीन महत्त्वाच्या विषयांवरील प्रस्ताव मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आले आहेत. सभेच्या अजेंड्यावर एकूण नऊ विषय आहेत.
पर्यावरणपूरक व शाश्वत बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्रधारक इमारतींना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. प्लॅटिनम प्रमाणपत्रधारकांना १० टक्के, गोल्डला ७.५ टक्के आणि सिल्व्हर प्रमाणपत्रधारकांना ५ टक्के करसवलत देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, पाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक प्रकाश-वायुवीजन, कचरा व्यवस्थापन आणि हिरवळ यांसारख्या निकषांचा विचार केला जाणार आहे. IGBC, GRIHA आणि LEED या मान्यताप्राप्त संस्थांची प्रमाणपत्रे ग्राह्य धरली जाणार असून, प्रत्यक्ष पाहणीनंतरच सवलत देण्याची तरतूद आहे.
महापालिकेच्या अग्निशामक दलात मंजूर ९० पदांपैकी सध्या केवळ ५२ अग्निशामक सेवक कार्यरत आहेत. शहरात दरवर्षी ३५० ते ४०० आग व अपघातांचे कॉल येत असल्याने ४० प्रशिक्षित अग्निशामक ११ महिन्यांसाठी बाह्यस्रोत पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे १ कोटी ३ लाख ३१ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.अग्निशमन दलाला ४० तात्पुरते अग्निशामक घेण्याचा प्रस्ताव आहे.
वृक्ष प्राधिकरणाची पुनर्रचना
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण समितीची पुनर्रचना केली जाणार आहे. आयुक्त अध्यक्ष, उद्यान विभागातील अधिकारी वृक्ष अधिकारी व सहाय्यक वृक्ष अधिकारी असतील. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग तसेच वनस्पतीशास्त्रातील तज्ज्ञ प्राध्यापकांचा सदस्य म्हणून समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे धोकादायक वृक्ष, वृक्षतोड परवानगी आणि वृक्षसंवर्धनाशी संबंधित निर्णय घेणे सुलभ होणार आहे.
—-
Post Views: 6