सोलापूर – गाझीपूर सिटी (उत्तर प्रदेश) येथील कान्हा हवेली येथे दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या स्पेशल ऑलंम्पिया राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरचा सुपुत्र आणि भैरुरतन दमाणी अंध शाळेचा माजी विद्यार्थी सर्वलिंग काळेल याने ज्युनिअर गटातील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे सोलापूरच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
——-
अंधत्वावर मात करत मिळवले यश
सर्वलिंगचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याच्या आईने इतरांकडे धुणे-भांडी आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकला. अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही आईने दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. विशेष म्हणजे, सर्वलिंग आणि त्याचा धाकटा भाऊ दोघेही अंध आहेत. घरची बिकट आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक आव्हानांवर मात करत सर्वलिंगने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे राष्ट्रीय स्तरावरील यश संपादन केले आहे.
——-
मुंबईत घेतोय उच्च शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण
सर्वलिंग हा सध्या मुंबई येथील कीर्ती कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे. खेळाची आवड जपण्यासाठी तो प्रभादेवी (मुंबई) येथील कामगार मैदानाच्या व्यायामशाळेत पॉवरलिफ्टिंगचे खडतर प्रशिक्षण घेत आहे. त्याला प्रशिक्षक लक्ष्मण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
——–
सोलापूरकरांकडून कौतुकाचा वर्षाव
सोलापूरचे प्रसिद्ध उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव संतोष भंडारी, मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे अंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गंगा कदम व त्याचे मार्गदर्शक राजू शेळके यांनी सर्वलिंगचे विशेष कौतुक करून त्याला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि क्रीडा प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
——–
Post Views: 5