मंगळवेढा – तालुक्यातील संत दामाजी नगर परिसरात शासकीय उजनी कालवा उद्ध्वस्त करून त्यामध्ये मुरूम भरून पक्का रस्ता तयार केल्याच्या गंभीर प्रकरणात प्रशासनाकडून कारवाईस होत असलेल्या दिरंगाईविरोधात अण्णासाहेब विठोबा आसबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधितावर ठोस कारवाई न झाल्यास ११ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी जलसंपदा मंत्रालय व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
# संत दामाजी नगर येथील गट क्रमांक ३२०४, ३२०५ व ३२०५/२ परिसरातील जमीन मालक मोहन नकाते, शिवाजी नकाते, सिद्धेश्वर नकाते तसेच प्रशांत बाबुराव गायकवाड यांनी संगनमत करून १ जून २०२६ पासून उजनी कालवा विभागाचा सुमारे चारशे मीटर लांबीचा कॅनॉल उद्ध्वस्त केला, असा आरोप आसबे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.
# कॅनॉल उद्ध्वस्त करण्यासाठी आणि वृक्षतोडीसाठी वापरलेली अवजारे अद्याप जप्त करण्यात आलेली नाहीत. तसेच जमिनीच्या मूळ मालकावर कारवाई का झालेली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढेरे यांच्याकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोपही आसबे यांनी केला आहे.
# १५ ऑगस्ट २०२६ रोजी आसबे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सोलापूर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. तेव्हा भीमा पाटबंधारे विभाग, पंढरपूरचे कार्यकारी अभियंता प्रशांत कपले यांनी सात दिवसात कालवा खुला करण्याची लेखी आश्वासने दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र आश्वासनानंतर २५ दिवस होऊन सुद्धा प्रत्यक्ष कारवाई झालेली नसल्याने आता प्रश्न उपस्थित होत आहे.
# प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आपला विश्वास उडाला असून या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता निर्माण झाल्याचा गंभीर आरोप आसबे यांनी निवेदनातून केला आहे. ११ सप्टेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे.
# कालव्याच्या बाजूची झाडे तोडण्यात आल्याचा आरोप असतानाही सामाजिक वनीकरण विभागाकडून अपेक्षित अशी कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आसबे यांनी म्हटले आहे. त्या सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासनाला निवेदनातील मागण्या
# कालवा उद्ध्वस्त करणाऱ्यांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा
वापरलेली अवजारे जप्त करावीत.
मूळ जमीन मालकांवर कारवाई करावी
सात दिवसांत कालवा खुला करण्याचे आश्वासन पूर्ण करावे
प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी
आर्थिक देवाण-घेवाणीचा तपास करावा.
# उजनी कालवा हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कालवा बुजवून रस्ता तयार केल्याने शेतीचे पाणी वाया जात असून, शेतकऱ्यांवर उजनीचे पाणी न मिळाल्याचा परिणाम होत आहे.
Post Views: 6