बार्शी – व्यवसायासाठी आवश्यक मटेरियल देण्याचे आश्वासन देऊन पैसे स्वीकारल्यानंतर मटेरियल न पाठवता तसेच उर्वरित रक्कम परत न करता २ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद, लक्ष्मी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, बार्शीचे व्यावसायिक अक्षय शिरीष बंडेवार यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीनुसार, बंडेवार यांनी आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या मटेरियलच्या संदर्भात ऑनलाइन जाहिरात पाहिल्यानंतर धवल प्लास्टिक, विजय इस्टेट, ओढव, अहमदाबाद येथील प्रोप्रायटर कमल यांच्याशी संपर्क साधला होता. सुरुवातीला व्यवहार झाल्यानंतर मटेरियल मिळाल्याने पुढील व्यवहारासाठीही त्यांनी संबंधितांशी संपर्क केला.
त्यानुसार बंडेवार यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी २ लाख रुपये आणि २९ नोव्हेंबर रोजी १ लाख ५० हजार रुपये, असे एकूण ३ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे संबंधित फर्मला पाठवले. तसेच २० नोव्हेंबर रोजी खरेदी आदेशही ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मात्र, पैसे पाठवल्यानंतर मटेरियल मिळाले नाही. याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला वाहन उपलब्ध नसल्याचे, त्यानंतर मटेरियल पाठविल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मटेरियल मिळाले नसल्याने बंडेवार यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी १५ दिवसांत मटेरियल अथवा पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बंडेवार यांनी २५ जानेवारी २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर संबंधितांनी २७ जानेवारी रोजी ५० हजार आणि ३० जानेवारी रोजी ९० हजार रुपये, असे एकूण १ लाख ४० हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित २ लाख १० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करून, ‘पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे सांगून फोन घेणे बंद केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
वारंवार संपर्क करूनही मटेरियल अथवा उर्वरित रक्कम मिळाली नसल्याने बंडेवार यांनी आपली २ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
Post Views: 3