पंढरपूर – डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१, रिजन-१ यांच्या वतीने लायन्स क्लब पंढरपूरच्या अंध विकास संस्था संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंध शाळेतील विशेष शिक्षक महेश म्हेत्रे यांना ‘गुणवंत विशेष शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सोलापूर येथील शिवस्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते महेश म्हेत्रे यांना श्रीफळ, शाल व सन्मानपत्र देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत सन्मानित करण्यात आले.
गेली २० वर्षे अंध विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निःस्वार्थपणे व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महेश म्हेत्रे यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अंध विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर आत्मविश्वास, संस्कार, स्वावलंबन आणि जीवनमूल्ये देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
या पुरस्कार सोहळ्यास शिवव्याख्याते व दुर्गभ्रमंतीकार डॉ. शिवरत्न शेटे, लायन्स प्रांतपाल लायन राजेंद्र शहा-कांसवा, उपप्रांतपाल लायन डॉ. किरण खोराटे, लायन मंगेश दोशी, रिजन चेअरमन लायन डॉ. महेश नळे, झोन चेअरमन लायन उमेश आटपाडीकर यांच्यासह लायन्स इंटरनॅशनलचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजविलेले संस्कार, विचार आणि संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले.
अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी दोन दशके केलेल्या सेवेला मिळालेला हा सन्मान म्हणजे महेश म्हेत्रे यांच्या कार्याची प्रेरणादायी पोचपावती ठरली आहे.
या पुरस्काराबद्दल अंध विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नागिरी गोसावी, लायन्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष अतुल कोलवार, सचिव डॉ. विवेक गुंडेवार, तसेच शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्री. महेश म्हेत्रे व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
Post Views: 12