सोलापूर : दिवसभर बातम्यांच्या शोधात धावपळ करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. उत्तम आरोग्य असेल तरच अधिक जोमाने आणि प्रभावीपणे कर्तव्य बजावता येते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांनी केले.
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटर आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, जेसीएफए मिनिस्ट्री सोलापूरचे संस्थापक डॉ. डॅनियलपॉल यंगल, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक ‘पुढारी’चे संपादक संजय पाठक, होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरचे डॉ. राजेश सांगे आणि डॉ. प्रकाश सांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, पत्रकार हे समाजातील महत्त्वाचा घटक असून ते दिवसभर विविध घटनांचे वार्तांकन करण्यासाठी धावपळ करीत असतात. या व्यस्त दिनचर्येत अनेकदा त्यांच्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पत्रकारांनी नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. डॅनियलपॉल यंगल यांनी होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरच्या उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात डॉ. राजेश सांगे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. होली स्पिरिट फिजिओथेरपी सेंटरच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.श्रमिक पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. प्रकाश सांगे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 7